खामगांव (प्रखर प्रहार): काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी युतीने स्थानिक राजकारणात खळबळ माजवली असून, महायुतीतील घटकपक्ष शिवसेना शिंदे गटाला अपेक्षित मान-सन्मान न मिळाल्याने स्थानिक नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. शिंदे गटाच्या एका छोट्या गटाला भाजप जवळ आणण्याचा प्रयत्न होत असला, तरी मोठा गट नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खासदार ना. प्रतापराव जाधव यांनी शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांना दिलेली ताकद आणि सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यातील यश यामुळे तरुणांचा कल शिंदे गटाकडे वाढत आहे. याचा चटका भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना बसत असून, दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये वैचारिक मतभेद कमालीचे वाढले आहेत.
शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष राजू बघे यांनी संपर्कातील अनेक तरुणांना पक्षात प्रवेश देऊन धडाका लावला आहे. यामुळे पक्षनेत्यांना त्यांची दखल घेणे आणि त्यांचे निर्णय मान्य करणे भाग पडत आहे.
काँग्रेस-वंचित युतीत शिंदे गट सामील झाल्यास ही आघाडी अधिक मजबूत होऊन सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणू शकते. इतकेच नव्हे, तर गेल्या ३० वर्षांपासून शहराचे राजकारण काही साथीदारांसह हाती ठेवून मनमानी करणाऱ्यांच्या हातून सत्तेच्या दोऱ्या कापण्यात यश मिळू शकते. यामुळे सर्व पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.










