खामगांव (प्रखर प्रहार): मागील अनेक वर्षांपासून लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीच्या चर्चा फिस्कटल्या. यामुळे नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता दोन्ही पक्षांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा केल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांसाठी राजकीय जीवनदान ठरणाऱ्या असतात. युती झाल्यास उमेदवारांच्या विजयाची शक्यता वाढते. तिरंगी किंवा चौरंगी लढतीत बलाढ्य पक्षांच्या उमेदवारांकडे पक्षशक्ती आणि आर्थिक बळ असते. यामुळे छोट्या पक्षांचे कार्यकर्ते कमकुवत ठरतात; ते एकतर निवडणुकीतून माघार घेतात किंवा पराभव स्वीकारतात. स्वबळावर लढण्याच्या निर्णयाला कार्यकर्ते विरोध करतात, परंतु वरिष्ठ नेत्यांपुढे त्यांचे काही चालत नाही.
मागील अनेक वर्षांपासून अशी युती न झाल्याने अनेक कार्यकर्ते वयोवृद्ध झाले असून त्यांना पक्षाकडून काहीच मिळाले नाही. प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखालील मोजक्या कार्यकर्त्यांनाच लाभाचे पद किंवा काम मिळाले. सामान्य कार्यकर्त्यांचे जीवन व्यर्थ गेले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आजही अनेक जुन्या नेते-कार्यकर्ते आर्थिक अडचणीत जीवन जगत आहेत. वरिष्ठ नेत्यांच्या जवळच्या स्थानिक नेत्यांच्या चेल्यांनाच उदरनिर्वाहाची साधने मिळाली असून असे कार्यकर्ते बोटावर मोजण्याइतके आहेत.
येणाऱ्या निवडणुकीत पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. काँग्रेस-वंचित युती कार्यकर्त्यांना राजकीय जीवनदान देणारी ठरेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. शिवसेना शिंदे गटही युतीत सामील झाल्यास गेल्या ३० वर्षांपासून शहराचे राजकारण चालवणाऱ्यांना लगाम बसेल, अशी चर्चा आहे.










