मोताळा (विजय दोडे– प्रखर प्रहार): धम्मदीप बुद्धविहार कोथळी येथे रामजी सपकाळ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम ज्येष्ठ उपासक पंढरी सावळे, धर्माजी वाघोदे, उपासिका गंगाबाई सावळे, ताईबाई सावळे, निर्मला सावळे यांच्याकडून अधिष्ठानाचे पूजन करण्यात आले. नंतर सामूहिक त्रिशरण-पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
धम्म उपासक सोपान सावळे (भा.बौ. महासभा संस्कार सचिव) यांनी मनोगतात म्हटले की, “रामजी बाबांनी आपल्या मुलाला म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घडविण्यासाठी त्याच्या मनात पेटवलेली शिक्षणाची ज्योत आज बाबासाहेबांच्या रूपाने संपूर्ण जगाला प्रकाश देत आहे.”
समाजात बाबासाहेबांसारखे विद्यार्थी घडविण्यासाठी प्रत्येक घरात रामजी बाबांप्रमाणे कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी प्रत्येकाला दर रविवारी बुद्धविहारात यावेच लागेल, असे आव्हान धम्म उपासक युवराज भिडे यांनी आपल्या मनोगतात केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र धुरंधर यांनी केले, तर आभार विनोद सावळे यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्याने उपासक, उपासिका, बालक-बालिका व युवा पैलवान ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. निनाजी सुरळकर यांनी खीर दान करून धम्म पालन गाथेने कार्यक्रम संपन्न झाला.











