बुलडाणा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) बुलडाणा जिल्हा संघटनेच्या वतीने चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव, आदर्श प्रशासक विद्याधरजी महाले यांचा मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित असलेल्या या पक्षाच्या जिल्हा स्तरावरील कार्यक्रमात शरद कला महाविद्यालयाच्या हॉलमध्ये हा सत्कार सोहळा पार पडला. रिपाई जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव, समाजभूषण ज्येष्ठ नेते इंजि. प्रा. भैयासाहेब पाटील आणि महासचिव विजय साबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी आमदार श्वेताताई महाले पाटील आणि विद्याधरजी महाले यांना संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र संविधान ग्रंथावर पुष्पगुच्छ अर्पण करून सन्मानित करण्यात आले. दोघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाला राजे लखुजीराव जाधव यांच्या जन्मस्थळाशी संबंधित आडगाव राज्याचे संभाजीराजे कहाळे यांचे नातू, सरपंच व पत्रकार रामदासजी कहाळे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष नबाब मिर्झा बेग, बुलडाणा तालुकाध्यक्ष केशवराव सरकटे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दिलीप काकडे, उपाध्यक्ष इंजि. भास्करराव जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. मुक्तार पठाण, जिल्हा महिलाध्यक्षा वंदनाताई वाघ, युवा जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील (म्हस्के), विदर्भ महिला उपाध्यक्ष आशाताई वानखेडे आदींसह अनेक जिल्हा व तालुका स्तरावरील रिपाई पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात सिंदखेड राजा, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर आदी ठिकाणचे तालुकाध्यक्ष आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. उपस्थित सर्वांनी विकासकामांसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आमदार श्वेताताई महाले पाटील आणि प्रशासकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल विद्याधरजी महाले यांचे कौतुक केले.
(प्रखर प्रहार न्यूज नेटवर्क)















