भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेली घटना प्रत्येक बापाच्या, प्रत्येक आईच्या काळजाला भेदून जाते. निष्पाप चिमुकलीवर झालेल्या निर्घृण अत्याचाराने संपूर्ण पुणे परिसर हादरला आहे. अशा विकृत मानसिकतेच्या माणसाला कोणतीही जात, धर्म किंवा समाज नसतो. पण समाजाने अशा नराधमांना कोणतीही सहानुभूती देऊ नये, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
नुकत्याच भोरमध्ये घडलेल्या या प्रकरणात भीमराव कांबळे (वय ६५) या आरोपीने साडेतीन-चार वर्षांच्या चिमुरडीला ‘वासरू दाखवतो’ म्हणून गुरांच्या गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली आणि मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला. सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपीची ओळख पटली आणि पोलिसांनी लवकरच त्याला अटक केली. या घटनेने गावात प्रचंड रोष निर्माण झाला. नागरिकांनी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून आंदोलन केले आणि न्यायाची मागणी केली.
ही घटना केवळ एका व्यक्तीची विकृती नाही, तर समाजातील काही लोकांच्या मानसिकतेची झलक आहे. अशा प्रकरणांमध्ये काही लोक आरोपीच्या जाती-धर्माच्या आधारावर राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. कांबळे हा बौद्ध समाजातील असल्याचे समजताच काही जातीयवादी तत्त्वज्ञानींनी संपूर्ण समाजाला टार्गेट करण्यास सुरुवात केली. पण यात लक्षात घ्यायला हवे की, अशा विकृत वृत्तीला कोणत्याही समाजातील सुज्ञ नागरिक समर्थन देत नाहीत. उलट, या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
यापूर्वी बीड आणि खरात येथील प्रकरणांमध्येही अनेक नेते आणि स्वयंघोषित समाजसेवक मौन बाळगून बसले होते. जेव्हा आरोपी कोणत्या समाजाचा आहे हे स्पष्ट होईपर्यंत काहींनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट टाकले. पण जेव्हा वास्तव समोर आले तेव्हा तेच लोक चूप बसले. यावरून हे स्पष्ट होते की, काही लोकांना गुन्हेगाराची जात महत्त्वाची वाटते, गुन्हा नव्हे.
भोरमधील या घटनेत मात्र चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोणत्याही प्रकारचे समर्थन मिळताना दिसत नाही. लोकांचा रोष स्वाभाविक आहे. अशा प्रकारच्या निर्दयी गुन्हेगारांना तात्काळ फाशीची शिक्षा देणारा कायदा करण्याची मागणी जोर धरत आहे. अनेक नागरिकांचा असा आग्रह आहे की, या कायद्याची सुरुवात भीमराव कांबळे या नराधमापासूनच करावी, जेणेकरून इतरांनाही धडा मिळेल.
अशा घटनांमुळे बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिसांनी तपास लवकर पूर्ण करावा आणि न्यायालयानेही या प्रकरणाला फास्ट ट्रॅक कोर्टात न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. चिमुरडीच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत ही मागणी कायम राहील.
समाज म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा विकृत घटनांविरुद्ध बळकट भूमिका घ्यायला हवी. चिमुकल्यांचे बालपण सुरक्षित राहिले तरच भविष्य सुरक्षित राहील. नराधमांना कठोर शिक्षा मिळाली तरच समाजात भीती निर्माण होईल आणि असे गुन्हे थांबतील.













