डोंबिवली – डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हते, तर ते एक प्रेरणादायी विचारधारा होते. त्यांच्या जयंतीचा दिवस भारतीयांसाठी नेहमीच आनंद आणि स्मरणाचा क्षण असतो. याच भावनेतून जनजागृती सेवा संस्थेने डोंबिवली येथे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करत त्यांची १३५वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली.
कार्यक्रमात सर्वप्रथम भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी शिवम वखरे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर इतर मान्यवरांनीही पुतळ्याचे दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. यामध्ये भंडारी मंडळाचे विश्वस्त संजय पोखरणकर, उद्योग ऊर्जा बिझनेस संस्थेचे संस्थापक जादुगार अभिजित (भगवान पवार), क्राईम बॉर्डरचे पोलीस पत्रकार राजेंद्र वखरे, कवयित्री व गायिका सुनिता काटकर, स्वानंद इन्व्हेस्टच्या संचालिका चित्रा राऊत, म्युझिक मंत्रा एंटरटेनमेंटच्या संचालिका शर्मिला केसरकर, आयसाईट फिनट्रेड प्रा. लि.चे पार्टनर अभिषेक मुणगेकर, भंडारी मंडळाचे अध्यक्ष रजनिश चौगुले, सिंधुदुर्ग जिल्हा मित्र मंडळाचे गोविंद म्हाडगुत, भंडारी मंडळाचे विश्वस्त रघुवीर तांडेल, सरचिटणीस महेश पारकर, संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार अरविंद सुर्वे, सिध्दपा भोरकडे, खजिनदार दत्ता कडुलकर आणि जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांचा समावेश होता.
या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, खजिनदार दत्ता कडुलकर आणि ज्येष्ठ सल्लागार अरविंद सुर्वे यांच्या हस्ते शाल, गुलाबपुष्प, कार्य अहवाल, आकर्षक पेन आणि आभारपत्र देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ सल्लागार अरविंद सुर्वे आणि खजिनदार दत्ता कडुलकर यांनी विशेष मेहनत घेतली. उपस्थित सर्वांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम केले आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचे बांधिलकी व्यक्त केली.
जनजागृती सेवा संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक जागृतीच्या कामात सक्रिय असून, आंबेडकर जयंतीसारखे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करत असते. यावर्षीही डोंबिवलीकरांनी उत्साहाने सहभाग घेतला.










