खामगाव (दि. १२ एप्रिल २०२६) : हिंदुत्व चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख प्रणेते डॉ. प्रवीणभाई तोगडिया यांचे खामगाव शहरात आगमन झाले असता शिवसेना व विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त आणि भव्य स्वागत करण्यात आले.
हॉटेल तुळजाई, खामगाव येथे आयोजित सत्कार समारंभात शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदूसेवक अमोल भाऊ अंधारे आणि शिवसेना परिवार यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. तोगडिया यांनी हिंदुत्वाच्या विविध मुद्द्यांवर भाष्य केले. “सशक्त हिंदू, समर्थ हिंदू आणि संघटित हिंदू ही आज काळाची गरज आहे. सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मजबूत हिंदू समाज घडवला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अमोल अंधारे यांच्यासोबत गेल्या ४० वर्षांपासून चालत आलेल्या हिंदुत्व कार्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. खामगाव शहराशी असलेले त्यांचे जुने संबंध आणि यापूर्वीच्या सभांमधील संवादाचा त्यांनी उल्लेख केला.
समारंभात विप्र संघटना खामगाव, हिंदू राष्ट्र सेना, लहुजी सेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, ओबीसी संघटना, गौबुक अँप आदी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी डॉ. तोगडिया यांचा यथोचित सत्कार केला. कार्यक्रमाचे संचलन शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांनी केले, तर आभारमान शिवसेना शहर प्रमुख चेतन ठोबरे यांनी मानले.
कार्यक्रमानंतर डॉ. प्रवीणभाई तोगडिया यांनी अमोल अंधारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर ते अकोला येथील पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.
या भेटीमुळे खामगावातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण झाला असल्याचे दिसून आले.
(प्रखर प्रहार न्यूज नेटवर्क)













