खामगाव (प्रतिनिधी):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी आंबेडकरवादी अधिकारी व कर्मचारी ग्रुपने भीम अनुयायांसाठी एक उपयुक्त सेवा पुरवली. भर दुपारच्या उन्हात भीम जयंती मिरवणुकीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना थंड पाणी आणि आम पना वाटप करून ग्रुपने सर्वांचे स्वागत केले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही भीम जयंती मिरवणुकीत ग्रुपने स्टॉल लावून पाणी आणि आम पना वाटप केले. मिरवणुकीतील सहभागींना या सेवेचा लाभ झाला. विविध सामाजिक उपक्रम राबवणारा हा ग्रुप सलग चार वर्षांपासून निस्वार्थ भावनेने समाजसेवा करत आहे. मानापानाची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या ग्रुपचे कार्य अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे.
मिरवणुकीदरम्यान सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक पदाधिकाऱ्यांनी ग्रुपच्या स्टॉलला भेट दिली. यावेळी ग्रुपने सर्वांचे स्वागत पंचशील दुपट्टा देत केले. उपस्थितांनी ग्रुपच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.
ग्रुपचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते तथा नियोजन विभागातील कर्मचारी मिलिंद इंगळे यांनी सांगितले की, “स्वाभिमानी आंबेडकरवादी अधिकारी व कर्मचारी ग्रुप निःस्वार्थ भावनेने आणि प्रामाणिकपणे समाजसेवा करत आहे. वर्षभर विविध उपक्रम राबवत आम्ही समाजासाठी योगदान देत राहू.”
भीम जयंतीच्या दिवशी केलेला हा छोटासा पण उपयुक्त उपक्रम खामगावकरांमध्ये चर्चिले गेला. ग्रुपचे हे सातत्यपूर्ण प्रयत्न आंबेडकर विचारांचा प्रसार करण्यासोबतच सामाजिक बांधिलकी दाखवणारे आहेत.












