खामगाव : स्थानिक सूर्योदय एज्युकेशन सोसायटीतर्फे संचालित युगधर्म पब्लिक स्कूल, खामगाव येथे पालकांच्या विशेष आग्रहामुळे एक महिन्याचे क्रिकेट व विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. हे शिबिर १५ एप्रिल २०२६ पासून सुरू होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री. गोपालजी अग्रवाल यांनी दिली.
यापूर्वी शाळेत ४ ते १० वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी आयोजित उन्हाळी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले होते. या शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करत आनंददायी आणि रोमांचक अनुभव घेतला होता.
युगधर्म पब्लिक स्कूल मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याचे संस्थाध्यक्ष गोपालजी अग्रवाल यांनी सांगितले. त्याचबरोबर युवराज क्रिकेट अकॅडमी, खामगाव यांच्या माध्यमातून ९ वर्षे आणि त्यावरील मुला-मुलींसाठी एक महिन्याचे उन्हाळी क्रिकेट व इतर क्रीडा प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात येणार आहे.
या शिबिरात जिम्नॅस्टिक (रिदमिक, रोप, अॅक्रोबॅटिक्स), कबड्डी, मल्लखांब, कुस्ती, जूडो, कराटे, सेल्फ डिफेन्स आदी विविध क्रीडाप्रकारांसाठी राज्यस्तरीय अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार आहे. क्रिकेट प्रशिक्षणासाठी रणजी खेळाडू श्री. मुन्ना शबीर, बुलढाणा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. राज राजपूत, श्री. खालिद हमदुले, श्री. सर्वेश सर आणि श्री. शेकोकर सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभेल.
हे प्रशिक्षण शिबिर खामगाव शहरातील सर्व मुला-मुलींसाठी खुले असून, जास्तीत जास्त क्रीडाप्रेमी विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन युवराज क्रिकेट अकॅडमी, खामगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ८४८३९२७७०२
(प्रखर प्रहार न्यूज नेटवर्क)














